बामरडा रेती घाट प्रकरणात ११ आरोपी अटकेत
बामरडा रेती घाट प्रकरणात ११ आरोपी अटके, तवरोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
मुख्य संपादक नावेद पठाण वर्धा
वरोरा :वरोरा तालुक्यातील बामरडा येथील वर्धा नदीच्या रेती घाटावर पैशांच्या वादातून भरत दयानंद नागपाल यांच्या हत्येची धक्कादायक घटना १ मार्च रोजी घडली. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाणे यांनी ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
माहितीनुसार, हिंगणघाट येथील व्यापारी पंकज केशव वानखडे (वय ३९) यांनी बामरडा येथील वर्धा नदीचा रेती घाट शासकीय लिलावातून भद्रावती येथील गितेश सातपुते यांच्याकडून दोन कोटी पाच लाख रुपयांत खरेदी केला होता. घाटाचा करार ९ जून २०२६ पर्यंत असताना २५ जानेवारी २०२६ रोजी घाट परत घेण्यात आला. उर्वरित ९८ लाख रुपये फेब्रुवारीपर्यंत परत देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र रक्कम परत न दिल्याने वाद निर्माण झाला.
१ मार्च रोजी सायंकाळी बामरडा रेती घाटावर काम सुरू असताना दोन पोकलेन मशीन व वाहने अडवण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटांत वाद वाढून मारहाण झाली. या मारहाणीत भरत नागपाल यांना बेदम मारहाण करून नदीत फेकण्यात आल्याचा आरोप आहे. स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणी सौरभ ठाकूर (रा. वर्धा), अमोल कांबडी (रा. सालोड हिरापूर), अक्षय खडसे (रा. वर्धा), उदय वालदे (रा. सालोड हिरापूर), नितीन कांबडी (रा. सालोड हिरापूर), सुनील झोरे (रा. सावंगी मेघे), प्रफुल उमाटे (रा. वर्धा), अतुल मोटघरे (रा. वर्धा), गितेश सातपुते (रा. भद्रावती) व अन्य दोन आरोपींविरुद्ध खुनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ मार्च रोजी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. उर्वरित आरोपींचा शोध घेत असताना काही जण मुंबईच्या दिशेने फरार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत उर्वरित आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत वर्धा स्थानिक गुन्हे शाखा पथकाचेही सहकार्य लाभले. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.