समशेर शेख यांचा सेवापूर्ती निमित्त भावनिक सत्कार

Sun 01-Mar-2026,08:50 PM IST -07:00
Beach Activities

समशेर शेख यांचा सेवापूर्ती निमित्त भावनिक सत्कार

भावनिक वातावरणात शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरव

वर्धा : तालुका प्रतिनिधी इरशाद शहा

वर्धा : वर्धा येथील ब्युरो प्रकल्प कार्यालयात कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री समशेर शेख यांच्या सेवापूर्ती निमित्त भावनिक व उत्साहपूर्ण सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम मॅडम उपस्थित होत्या.

यावेळी श्री शेख यांचा शाल, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम मॅडम व सहकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजेंद्र जगताप यांनी केली. त्यांनी शेख सरांच्या सेवाकाळाचा आढावा घेत त्यांच्या शांत, संयमी व सहकार्यशील स्वभावाचे कौतुक केले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती सविता घोडे यांनी आपल्या मनोगतात शेख सरांसोबतच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत विविध प्रसंगी मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक श्री आर. के. पिंपळकर यांनीही जुन्या आठवणी जागवत सत्कारमूर्तींना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी धावंजेवार यांनी मनोगत व्यक्त करत शेख सरांच्या कार्यतत्परतेचे व कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना श्री समशेर शेख यांनी आपल्या सेवाकाळात सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले. तसेच सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्काराबद्दल कार्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमास शेख सरांचे आप्तस्वकीय रजिया शेख (मुलगी) व खालिद खान उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. चिकटे मॅडम, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा हिरापूर तळणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री खडसे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.