दुष्काळात बांधकाम कामगारांचे अनुदान रखडले

Thu 08-Oct-2026,01:34 AM IST -07:00
Beach Activities

दुष्काळात बांधकाम कामगारांचे अनुदान रखडले

दिवाळीपूर्वी प्रलंबित अर्थसहाय्य खात्यावर जमा करण्याची स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेची मागणी

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा : जिल्ह्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळामुळे बांधकाम क्षेत्रातील कामे मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या हाताला रोजगार मिळणे कठीण झाले असून, त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे मागील सुमारे वर्षभरापासून प्रलंबित असलेले शैक्षणिक अर्थसहाय्य, गंभीर आजारासाठीचे अर्थसहाय्य, वैद्यकीय मदत, विविध अनुदाने तसेच इतर आर्थिक लाभ दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत, अशी मागणी स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेने केली आहे.

याबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश रा. अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री, कामगार मंत्री तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांना निवेदन पाठवून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

दुष्काळामुळे रोजगाराचे संकट

बांधकाम क्षेत्रातील कामे बंद असल्याने रोजंदारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांचे उत्पन्न थांबले आहे. ग्रामीण भागात शेतीवर आधारित मजुरीची कामेही दुष्काळामुळे कमी झाली आहेत. त्यामुळे कामगारांसमोर रोजगाराचे मोठे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत मंडळाकडून मिळणारे हक्काचे अर्थसहाय्यही अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने कामगारांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

प्रलंबित अर्जांसाठी विशेष मोहीम राबवा

दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंडळाने वर्धा जिल्ह्यातील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. पात्र अर्जांची तातडीने छाननी करून मंजुरी द्यावी आणि लाभाची रक्कम थेट संबंधित कामगारांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

विशेषतः शैक्षणिक अर्थसहाय्य, गंभीर आजारासाठीचे अर्थसहाय्य, वैद्यकीय सहाय्य, विविध अनुदाने आणि इतर आर्थिक लाभांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

“कामगारांच्या हाताला रोजगार नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या हक्काचे अनुदानही प्रलंबित ठेवू नये. बांधकाम कामगारांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका. पात्र कामगारांचे प्रलंबित अर्थसहाय्य दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावर जमा करावे,” अशी मागणी उमेश रा. अग्निहोत्री यांनी केली.

तसेच जिल्ह्यातील प्रलंबित अर्जांची संख्या, मंजूर व नामंजूर अर्जांचा तपशील आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती संघटनेला लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

— उमेश रा. अग्निहोत्री

संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना, वर्धा