इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर अधिकाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

Tue 06-Oct-2026,07:42 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत तालुक्यातील चोंडी–आंबा टी-पॉईंट परिसरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनशी संबंधित एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून उपलब्ध पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून,हल्ल्याच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्ला करणारी व्यक्ती अज्ञात असून घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे मयताचे नाव महेश अण्णाराव शेळके राहणार नांदेड इंडियन कॉर्पोरेशन उच्च अधिकारी असून तपासाची दिशा निश्चित केली जात असल्याचे समजते.

दरम्यान मृत व्यक्तीची संपूर्ण ओळख, हल्ल्याचे नेमके कारण आणि आरोपीबाबत अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

या घटनेची माहिती परिसरात पसरताच चोंडी–आंबा परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. .

या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेऊन घटनेमागील नेमके कारण समोर आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.