आर्वी नगराध्यक्षांच्या निवडीवर आक्षेप

Sat 03-Oct-2026,04:44 AM IST -07:00
Beach Activities

आर्वी नगराध्यक्षांच्या निवडीवर आक्षेप

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याचा व अतिक्रमणाचा आरोप

नावेद पठाण मुख्य संपादक, वर्धा 

आर्वी : आर्वी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा स्वाती प्रकाश गुल्हाणे यांच्या निवडीवर आक्षेप घेत त्यांचे अध्यक्षपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारी लेखी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे दाखल करण्यात आली आहे. गुरुवार कॉलनी, आर्वी येथील मिथुन साहेबराव कोरडे यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी ही तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, सन २०२५ मध्ये झालेल्या आर्वी नगर परिषद निवडणुकीत स्वाती गुल्हाणे या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम व स्थावर मालमत्तेची, विशेषतः पती-पत्नीच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती नमूद करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

नेहरू मार्केट परिसरातील त्यांच्या नावावर असलेल्या पक्के ओटे असलेल्या मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रात पूर्णपणे नमूद करण्यात आली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच नेहरू मार्केट येथील सार्वजनिक अथवा नगर परिषदेच्या जागेवर ओट्याच्या बाहेर आर.सी.सी. कॉलम उभारून टीनाचे शेड व पक्के बांधकाम केल्याचा आणि अतिक्रमण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी तक्रारदाराने महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १६(१)(क-२) चा दाखला देत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तक्रारदाराने प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेच्या माहितीसंदर्भात चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, कथित अतिक्रमणाबाबत तपास करून नियमानुसार कारवाई करावी तसेच सार्वजनिक जागेवरील कथित अतिक्रमण हटवावे, अशा मागण्या केल्या आहेत.

तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्राची प्रत, मालमत्ता नोंदणीचा उतारा तसेच कथित बांधकामाचे छायाचित्रे पुरावे म्हणून जोडण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या तक्रारीतील आरोपांची सत्यता संबंधित प्रशासनाच्या चौकशीअंती स्पष्ट होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणात कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.