वडनेर येथे स्वच्छता अभियानावर भाषण स्पर्धा

Sat 03-Oct-2026,04:38 AM IST -07:00
Beach Activities

वडनेर येथे स्वच्छता अभियानावर भाषण स्पर्धा

विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

नावेद पठाण मुख्य संपादक,वर्धा 

वडनेर : हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील इंदिरा गांधी कला महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’ युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता अभियान विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘मेरा युवा भारत’चे प्रतिनिधी सचिन महाजन यांच्या पुढाकाराने तसेच नागाजी युवा प्रेरणा मंडळ, गांगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी प्रा. दिनेश राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेत सहभागी होऊन आपले विचार मांडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘मेरा युवा भारत’च्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जात असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही अशा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छता ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग असली पाहिजे. घर, शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. रस्त्यावर कचरा टाकणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा अनावश्यक वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे तसेच कचरा योग्य ठिकाणी न टाकणे यांसारख्या सवयींमुळे समाजासमोर मोठ्या समस्या निर्माण होतात, असेही यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत कचरा कचरापेटीत टाकणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि इतरांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.

‘स्वच्छ रस्ता, स्वच्छ परिसर, स्वच्छ विचार आणि निरोगी जीवन’ या संदेशातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. ‘मी कचरा करणार नाही, दुसऱ्याला कचरा करू देणार नाही आणि माझा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी पुढाकार घेईन’, असा संकल्पही करण्यात आला.

भाषण स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘मेरा युवा भारत’चे प्रतिनिधी सचिन महाजन व प्रा. दिनेश राठोड यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश राठोड यांनी केले, तर आभारही त्यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.