महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन

Wed 30-Sep-2026,03:14 AM IST -07:00
Beach Activities

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन

वर्धा : प्रतिनिधी इरशाद शहा

वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सतर्फे ‘ड्रग्स फ्री वर्धा’ अभियानांतर्गत २९ सप्टेंबर रोजी जी.एस. कॉमर्स महाविद्यालय, वर्धा येथे अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. जिल्हा पोलीस दलाने तयार केलेल्या एनडीपीएस जनजागृती व्हिडिओचे सादरीकरण तसेच पीपीटीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत दामिनी पथकाच्या प्रमुख माधुरी वाघाडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने झाली.

‘नशा सोडा, जीवन जोडा’ आणि नशामुक्त समाज घडविण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. वर्धा शहर सुरक्षित व सशक्त बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले.

हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, दामिनी पथकाच्या प्रमुख माधुरी वाघाडे, पोलीस उपनिरीक्षक सनीकुमार बानोत, अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे पोलीस अंमलदार, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.