अल्लीपूरकरांच्या एकजुटीच्या संघर्षाला अखेर यश
अल्लीपूरकरांच्या एकजुटीच्या संघर्षाला अखेर यश
अल्लीपूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी पूर्ण; सचिन पारसडे यांचा दावा
वर्धा : प्रतिनिधी सुनील हिंगे, अल्लीपूर
अल्लीपूर व परिसरातील नागरिकांना महसूल आणि प्रशासकीय कामांसाठी वारंवार हिंगणघाट येथे जावे लागू नये, नागरिकांची होणारी गैरसोय कमी व्हावी आणि स्थानिक पातळीवर प्रशासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अल्लीपूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि अल्लीपूर येथील नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन व निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. १२ सप्टेंबर २०२४ रोजी अल्लीपूर येथील नागरिकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
निवेदनानंतरही मागणीची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. ३ जून २०२५ रोजी अल्लीपूर येथील तलाठी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतरही प्रशासन आणि शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला.
महसूल व इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून हिंगणघाट येथे जावे लागत होते. त्यामुळे अल्लीपूर आणि परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर प्रशासकीय सुविधा मिळाव्यात, ही प्रमुख मागणी होती. या मागणीला नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याने हा प्रश्न केवळ राजकीय मागणी न राहता संपूर्ण अल्लीपूर परिसरातील नागरिकांचा प्रश्न बनला.
याबाबत सचिन पारसडे म्हणाले, “अल्लीपूरकरांनी एकजूट दाखवून सातत्याने संघर्ष केला, म्हणून आज त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे. हा विजय कोण्या एका व्यक्तीचा नसून राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अल्लीपूर आणि परिसरातील नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचा आहे. नागरिकांचा प्रश्न असेल, तर त्यासाठी संघर्ष थांबवायचा नाही, ही आमची भूमिका आहे.”
अल्लीपूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांची महसूल आणि प्रशासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी होऊन स्थानिक पातळीवर शासकीय सेवा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळातही अल्लीपूर आणि परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे पारसडे यांनी सांगितले.