चौरे पिंपळा येथे बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त भव्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर

Sat 22-Aug-2026,05:36 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत तालुक्यातील मौजे चौरे पिंपळा हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मौजे चौरे पिंपळा येथे भव्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

या शिबिरामध्ये उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. डोळ्यांशी संबंधित विविध तक्रारी, रक्तदाब, मधुमेह तसेच इतर सामान्य आरोग्यविषयक समस्यांबाबत नागरिकांना डॉक्टरांकडून योग्य सल्ला देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी आयोजकांचे आभार मानले.

बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात सामान्य माणूस, शेतकरी, कामगार आणि समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरातून समाजसेवेची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हीच खरी समाजसेवा’ या भावनेतून शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमाचे नियोजन शिवसेनिक व मित्रपरिवार, श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजक तुषार जाधव पाटील भावी जिल्हा परिषद सदस्य सुनील काळे माजी नगराध्यक्ष व स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. नागरिकांची नोंदणी, तपासणीसाठी व्यवस्था, डॉक्टरांना आवश्यक सहकार्य तसेच शिबिरातील इतर नियोजन व्यवस्थित करण्यात आले.

शिबिरादरम्यान गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली. ग्रामीण भागात अशा प्रकारची आरोग्यविषयक जनजागृती आणि तपासणी शिबिरे सातत्याने आयोजित व्हावीत, अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे चौरे पिंपळा येथे सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा संदेश देण्यात आला. आरोग्यसेवेच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा हा प्रयत्न ग्रामस्थांच्या विशेष पसंतीस उतरला.