जांभूळघाट आश्रमशाळेत दारूच्या नशेत अधीक्षकाकडून विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल केल्याचा प्रकार उघडीस
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सन्मान आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्रमशाळेचे अधीक्षक प्रशांत आत्राम यांनी दारूच्या नशेत विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. तब्बल ८० विद्यार्थ्यांचे अशाप्रकारे केस कापण्यात आल्याची माहिती समोर आल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालकांच्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय त्यांचे अर्धे टक्कल करण्यात आले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे पूर्ण टक्कल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासासोबतच इतरांसमोर अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
घडलेला प्रकार विद्यार्थ्यांनी फोनवरून पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी आश्रमशाळेत धाव घेतली. विद्यार्थ्यांचे केस नेमक्या कोणत्या कारणासाठी कापण्यात आले, त्यासाठी विद्यार्थ्यांची अथवा पालकांची परवानगी घेण्यात आली होती का, तसेच ही कारवाई शिस्तीच्या नावाखाली करण्यात आली का, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत.
जांभूळघाट आश्रमशाळेत सुमारे ५७२ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती असून, त्यांच्या शिक्षणासोबतच सुरक्षितता, मानसिक स्वास्थ्य आणि सन्मानाची जबाबदारीही संबंधित प्रशासनाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी अशाप्रकारे वर्तन करण्यामागील नेमके कारण काय, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत आश्रमशाळा प्रशासनाने अधीक्षक प्रशांत आत्राम यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे स्वतंत्रपणे ऐकून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोष आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. या प्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.