हिंगणघाटमध्ये जीवन सुरक्षा अभियान; 308 वाहनचालकांवर कारवाई

Sat 03-Oct-2026,10:37 PM IST -07:00
Beach Activities

हिंगणघाटमध्ये जीवन सुरक्षा अभियान; 308 वाहनचालकांवर कारवाई

5 लाख 87 हजार 500 रुपयांचा दंड; अल्पवयीनांना वाहन दिल्याप्रकरणी पालकांवर दोन गुन्हे दाखल

नावेद पठाण मुख्य संपादक, वर्धा

हिंगणघाट : पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्ह्यात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी हिंगणघाट शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली

या अभियानात वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी विजयकुमार घुले, पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच हिंगणघाट पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार व वाहतूक पोलिस सहभागी झाले होते. रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणारे, विनापरवाना वाहन चालविणारे, ट्रिपलसीट, कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर असलेली वाहने, परवाना न बाळगणारे तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली

या कारवाईत एकूण 308 चलान प्रकरणे दाखल करण्यात आली असून 5 लाख 87 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी त्यांच्या पालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील कलम 199(अ) अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चार वाहनचालकांवर कारवाई करून त्यांची चारही वाहने ताब्यात घेण्यात आली

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतुकीच्या मार्गावर तसेच गर्दीच्या ठिकाणी अनधिकृत पार्किंग करू नये, निर्धारित पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, विनापरवाना वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा आणि चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन केले आहे

तसेच ट्रिपलसीट व कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर असलेली वाहने चालवू नयेत, असेही सांगण्यात आले

मोटार वाहन कायद्यानुसार करण्यात येणाऱ्या कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून वाहनचालकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण करणे आणि नागरिकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे हा आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात टाळणे आणि त्यांचे तसेच इतर नागरिकांचे जीवित सुरक्षित ठेवणे हा जीवन सुरक्षा अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले

जीवन सुरक्षा अभियान यापुढेही संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून नागरिकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वर्धा जिल्हा वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे