युवा परिवर्तन सामाजिक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन वर्धा जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेचा तातडीने आढावा घ्या; रेफरल, ICU-बेड व रक्त उपलब्धतेची चौकशी करा
युवा परिवर्तन सामाजिक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन वर्धा जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेचा तातडीने आढावा घ्या; रेफरल, ICU-बेड व रक्त उपलब्धतेची चौकशी करा
वर्धा प्रतिनिधी इरशाद शहा
वर्धा जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेबाबत विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रेफरल, ICU व बेड उपलब्धता तसेच रक्त उपलब्धतेच्या प्रश्नांची तातडीने चौकशी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम, जिल्हा शासकीय रुग्णालय, वर्धा तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे ही जिल्ह्यातील प्रमुख उपचार केंद्रे आहेत. मात्र तालुका व शासकीय रुग्णालयांमधून गंभीर रुग्णांना सेवाग्राम किंवा सावंगी येथे रेफर केले जाते.
या ठिकाणी ICU व बेड उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णांना पुढे रेफर केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गंभीर रुग्णांसाठी बेड शोधण्यात वेळ गेल्यानंतर त्यांना नागपूर येथे घेऊन जाण्याची वेळ येत असल्याने उपचारात होणाऱ्या विलंबाबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच रुग्णालयात रक्तपेढीची सुविधा उपलब्ध असतानाही रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांवर दबाव आणणे किंवा उपचारात विलंब होण्याच्या तक्रारींची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली.
सेवाग्राम व सावंगी येथील ICU, ऑक्सिजन व सर्वसाधारण बेडची सद्यस्थिती सार्वजनिक करावी, मागील सहा महिन्यांतील सरकारी रुग्णालयांमधून झालेल्या रेफरलची चौकशी करावी, तसेच ICU किंवा बेड उपलब्ध नसल्यास रुग्णांसाठी जिल्हास्तरीय तातडीची बेड-रेफरल व्यवस्था सुरू करावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
रुग्णांच्या जीवाशी संबंधित या प्रश्नांवर केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रशासनाने प्रत्यक्ष रुग्णालयांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय आरोग्यव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदन देताना युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जिल्हाध्यक्ष विशाल ईचपाडे, दिनेश परचाके, अमन नारायणे, ऋषी इंगोले, मनोज कळमकर, प्रशांत पाटील, इरशाद शाह, शेखर इंगोले आदी उपस्थित होते.