सेलू–सिरसगाव मार्गावरील खड्डे बुजवा; काँग्रेसचा रास्ता रोकोचा इशारा

Wed 30-Sep-2026,03:19 AM IST -07:00
Beach Activities

सेलू–सिरसगाव मार्गावरील खड्डे बुजवा; काँग्रेसचा रास्ता रोकोचा इशारा

प्रतिनिधी : सुनील अल्लीपूर

हिंगणघाट तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने सेलू–मदनी–सिरसगाव मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना २८ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

सेलू–मदनी–सिरसगाव हा वर्दळीचा मार्ग असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः पवनी गावाजवळील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन दिल्यापासून १० दिवसांत खड्डे बुजविण्याचे काम न झाल्यास सेलू–सिरसगाव मार्गावर कुठेही रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीने दिला आहे.

निवेदन देताना तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीराम साखरकर, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया विभाग नरेंद्र चाफले, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष रागिनीताई शेंडे, प्रा. डॉ. शंकर बोंडे, सुरेश गोहणे, राहुल वाटखेडे, खलील कुरेशी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.