मोपेडवरून २० लिटर गावठी दारूची वाहतूक; ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
मोपेडवरून २० लिटर गावठी दारूची वाहतूक; ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा, रामनगर पोलिसांनी अवैध गावठी दारू वाहतुकीवर कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत २० लिटर गावठी मोहाची दारू आणि मोपेड असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. २६ सप्टेंबर रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक गस्तीवर असताना, पांढरकवडा पारधी बेडा येथून एका पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून गावठी मोहाची दारू पिपरी मेघे, वर्धा येथे नेली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह पिपरी मेघे येथील पांढरकवडा मार्गावर नाकाबंदी केली.
दरम्यान, संशयित मोपेडस्वाराला थांबवून तपासणी केली असता त्याच्या ताब्यातील होंडा अॅव्हिएटर मोपेडच्या डिक्कीत दोन प्लास्टिक पन्न्यांमध्ये प्रत्येकी १० लिटर, अशी एकूण २० लिटर गावठी मोहाची दारू आढळून आली. दारूची किंमत ४ हजार रुपये असून, मोपेडची अंदाजे किंमत ६० हजार रुपये आहे. पोलिसांनी एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अरविंद नैनमुल्ला काळे (वय ४०, रा. पांढरकवडा पारधी बेडा, ता. जि. वर्धा) याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९५०/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५(अ)(ई) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अजहर खान करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक पोर्णिमा राखोंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.
कारवाईत पोलीस हवालदार गजानन इवनाथे, पोलीस हवालदार दीपक गेडे, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस हवालदार अजहर खान, पोलीस अंमलदार सचिन पवार, राहुल भोयर आणि रुपेश उगेमुगे सहभागी होते.