नायलॉन मांजा विक्री-वापरावर पूर्ण बंदी नगर परिषद बल्लारपूरचा इशारा,उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

Wed 07-Jan-2026,09:23 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते. मात्र या काळात वापरला जाणारा नायलॉन (चिनी) मांजा मानव, पक्षी तसेच पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत असल्याने नगर परिषद बल्लारपूर प्रशासनाने नायलॉन मांजाच्या विक्री, साठवणूक व वापरावर पूर्णतः बंदी घातली आहे.

ही कारवाई महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येत आहे.

नायलॉन अथवा कृत्रिम पदार्थांपासून तयार करण्यात आलेला आणि काचेचा चुरा अथवा रसायने लावलेला हा मांजा अविघटनशील असल्यामुळे पर्यावरणास मोठी हानी पोहोचवतो.

तसेच गळा चिरणे, गंभीर जखमा होणे अशा घटना घडून मानव व पक्ष्यांचे जीव धोक्यात येत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने शहरात विशेष पथके तैनात करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात असा मांजा आढळल्यास तो तात्काळ जप्त करण्यात येणार असून संबंधित दुकानदारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच त्यांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याची कारवाईही केली जाऊ शकते.

नायलॉन मांजा वापरताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तींवर मोठा दंड आकारण्यात येणार आहे.

जप्त करण्यात आलेला सर्व नायलॉन मांजा सिमेंट प्लांटकडे पाठवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मकरसंक्रांतीचा सण आनंदात आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने साजरा करावा. कोणाच्याही जीवितास धोका निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी.

व्यापाऱ्यांनी केवळ सुरक्षित अशा सुती (कॉटन) मांजाचीच विक्री करावी. शहरात कुठेही नायलॉन मांजाची विक्री होताना किंवा वापर होताना आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नगर परिषद बल्लारपूरशी संपर्क साधावा, असेही त्यांनी म्हटले आहे.