शेकापूरच्या जि.प. शाळेत प्रेरणादायी महिला मेळावा उत्साहात संपन्न

Sun 22-Feb-2026,11:17 AM IST -07:00
Beach Activities

शेकापूरच्या जि.प. शाळेत प्रेरणादायी महिला मेळावा उत्साहात संपन्न

अब्दुल कदीर बक्श हिंगणघाट 

हिंगणघाट — शेकापूर (बाई) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित महिला मेळावा उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व सामाजिक जाणीव जागवणाऱ्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. गावातील महिला, पालक भगिनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून करण्यात आली. शिवरायांच्या स्वाभिमान, धैर्य व कर्तृत्वाच्या विचारांना उजाळा देत महिलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.

मेळाव्यात प्रेरणादायी मार्गदर्शनपर व्याख्याने तसेच विविध सांस्कृतिक व मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘मिसेस शेकापूर’ स्पर्धा, रांगोळी, उखाणे, संगीत खुर्ची व लिंबू-चमचा स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. ‘मिसेस शेकापूर’ स्पर्धेत मनीषा सागर गोरख या विजेत्या ठरल्या. सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रणाली सायंकार व ॲड. अस्मिता मुंगल उपस्थित होत्या. डॉ. सायंकार यांनी महिलांच्या व किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करत मासिक पाळी संदर्भातील गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. सुदृढ पिढी घडविण्यासाठी आईचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुलांमध्ये मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम स्पष्ट करत, त्यांना मैदानी खेळ, वाचन व संवादाकडे वळविण्याची गरज अधोरेखित केली.

ॲड. अस्मिता मुंगल यांनी महिलांचे कायदेशीर हक्क व संरक्षण याबाबत मार्गदर्शन करत POCSO Act संदर्भातील माहिती दिली आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

मुख्याध्यापक परमेश्वर नरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक रामकृष्ण ढबाले व दिपाली सावंत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास तिजारे, उपाध्यक्ष सोनू बारापात्रे तसेच सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

हा महिला मेळावा महिलांमध्ये आत्मविश्वास, आरोग्यजाणीव, कायदेशीर सक्षमता आणि सामाजिक सहभाग वाढविणारा ठरला असून, शेकापूर गावात कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.