लयबद्ध सामूहिक म्युझिकल कवायतीने जिंकली प्रेक्षकांची मने;
लयबद्ध सामूहिक म्युझिकल कवायतीने जिंकली प्रेक्षकांची मने;
मॉडेल हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य आयोजन
कारंजा नावेद पठाण मुख्य संपादक
कारंजा भारतीय लोकशाहीचा गौरवशाली उत्सव असलेल्या ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार कारंजा (घा.) येथील मॉडेल हायस्कूल येथे शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने सामूहिक म्युझिकल कवायत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कवायतीत मॉडेल हायस्कूलसह ARC पब्लिक स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास कारंजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, गटशिक्षणाधिकारी विना धावडे तसेच भारत शिक्षण संस्थेचे संचालक अनिल खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मॉडेल हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी ७.३० वाजता मुख्याध्यापक विनोद कहारे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड सादर करत तिरंग्याला सलामी दिली. बँड पथकासह जयस्तंभापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली, ज्यामुळे परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
सामूहिक म्युझिकल कवायतीने उपस्थितांची मने जिंकली. संगीताच्या तालावर शेकडो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सादर केलेल्या शिस्तबद्ध हालचाली व प्रेरणादायी देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण मैदान भारावून गेले होते.
यानंतर मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेला भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या बलिदानाचा प्रतीकात्मक प्रसंग प्रेक्षकांसाठी अंगावर शहारे आणणारा ठरला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी विना धावडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “अशा सामूहिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना व एकाग्रता वाढीस लागते. संगीताच्या तालावर सादर होणारी ही कवायत केवळ शारीरिक व्यायाम नसून ती एक सशक्त कला आहे.”
कार्यक्रमास मुख्याध्यापक विनोद कहारे, उपमुख्याध्यापक रवींद्र डोंगरदेव, पर्यवेक्षक चंद्रशेखर गिऱ्हाळे, कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख सचिन दिघडे, माजी शिक्षक, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विनोद चाफले यांनी केले.