पटेल चौकातील सट्टा अड्ड्यावर LCB ची धडक; चौघांना अटक, २४,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पटेल चौकातील सट्टा अड्ड्यावर LCB ची धडक; चौघांना अटक, २४,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
वर्धा : वर्धा शहरातील गजबजलेल्या पटेल चौक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर सट्टा अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत चार जणांना अटक केली. या कारवाईत आरोपींकडून २४ हजार ६६० रुपयांची रोख रक्कम तसेच जुगार खेळण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पटेल चौक येथील एस. के. पानठेल्याच्या मागील बाजूस काही जण बेकायदेशीरपणे सट्टा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे LCB पथकाने घटनास्थळी सापळा रचून छापा टाकला. छाप्यादरम्यान जुगार खेळत असलेल्या चार जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
• समीर उर्फ शेहजाद सलाम शेख
• निशाद अली शौकत अली
• शेख दानिश शेख युसुफ
• रितेश शत्रुघ्न नाखले
आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी वापरलेले साहित्य तसेच २४,६६० रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल ईटेकर, पोलीस हवालदार अमर लाखे, पवन पन्नासे, आशीष महेशगौरी तसेच पोलीस अंमलदार प्रफुल्ल पुनवटकर यांनी सहभाग घेतला.
शहरातील मध्यवर्ती व वर्दळीच्या भागात सुरू असलेल्या या बेकायदेशीर सट्टा अड्ड्यावर कारवाई झाल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. दरम्यान, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.