तबला विशारद विपुल ढोले यांचा गौरव

Thu 12-Feb-2026,02:47 AM IST -07:00
Beach Activities

तबला विशारद विपुल ढोले यांचा गौरव

कारंजा (घाडगे) नावेद पठाण मुख्य संपादक

अथक परिश्रम, संगीताप्रती असलेली निष्ठा, आई-वडिलांची प्रेरणा आणि गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन यांच्या बळावर कारंजा येथील विपुल विभाकर ढोले याने तबला विशारद पदवी प्राप्त करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या तबला विशारद परीक्षेत त्याने विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

जिद्द आणि चिकाटीचे यश

विपुलला बालपणापासूनच लय-तालाची विशेष आवड होती. गेल्या काही वर्षांपासून तो शास्त्रीय संगीत व तबल्याचे रीतसर शिक्षण घेत आहे. दररोज पाच ते सहा तासांचा नियमित रियाज आणि संगीतातील सूक्ष्म बारकावे आत्मसात करण्याची त्याची चिकाटीच या यशामागील प्रमुख कारण ठरली आहे. विशारद ही पदवी संगीतातील पदवीच्या समकक्ष मानली जात असून, त्यामुळे आता विपुलचा समावेश अधिकृत शास्त्रीय वादकांच्या श्रेणीत झाला आहे.

गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

आपल्या यशाचे श्रेय देताना विपुल म्हणाला, “माझे गुरु डॉ. देवेंद्र यादव यांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचा अखंड पाठिंबा यामुळेच मी हे यश मिळवू शकलो. तबला हे केवळ वाद्य नसून ती एक साधना आहे आणि ही साधना मी आयुष्यभर सुरू ठेवणार आहे.”

कारंजा नगरीचे ग्रामदैवत संत लटारे महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कीर्तन संमेलनात तबला विशारद विपुलने परीक्षकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. तसेच संगीत क्षेत्रातील मानाची समजली जाणारी अलंकार परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल संमेलनाच्या आयोजकांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांचे संगीत गुरु डॉ. देवेंद्र यादव उपस्थित होते. सर्व स्तरांतून विपुलच्या यशाचे कौतुक होत आहे.