केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके सन्मानित
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या अवैध किडनी विक्री प्रकरणाचा तसेच अवैध सावकारी प्रकरणाचा यशस्वी तपास करून उल्लेखनीय कामगिरी करणारे चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून सन २०२६ चे प्रतिष्ठित केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. यासोबतच सध्या रामनगर पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनाही विशेष तपासातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पदक प्रदान करण्यात आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या यशामुळे चंद्रपूर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पोलीस-१ विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला असून, केंद्रीय गृहमंत्री यांच्या मान्यतेने विशेष मोहीम, तपास आणि न्यायवैद्यक शास्त्र या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना २०२६ चे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर करण्यात आले आहे.
अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेल्या अवैध किडनी विक्री प्रकरणाचा तसेच अवैध सावकारी प्रकरणाचा सखोल तपास करून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. या प्रकरणांमधील गुन्हेगारीचे स्वरूप, त्यामागील यंत्रणा आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या या उल्लेखनीय तपासकार्याची केंद्र सरकारने दखल घेत त्यांना या प्रतिष्ठित पदकाने सन्मानित केले आहे.
तर रामनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार महिला पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी नागपूर येथे कार्यरत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेल्या गंभीर प्रकरणाचा तपास केला होता. या प्रकरणाचा तपास करताना त्यांनी कर्नाटक राज्यातील कारागृहातून संबंधित आरोपीला अटक केली होती. या प्रकरणात दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक प्रकरणाचा यशस्वी तपास केल्याबद्दल त्यांच्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.
महाराष्ट्रातील पोलीस दलातील अन्य अधिकाऱ्यांचाही या पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये कुमार चिंता, पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, एसीपी रामेश्वर रेंगे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड, पोलीस निरीक्षक माणिक बेंद्रे, रितेश अहेर, रामचंद्र मोहिते आणि महिला पोलीस निरीक्षक अश्विनी अभिजीत पाटील यांचा समावेश आहे.
गुन्हेगारीविरोधातील प्रभावी तपास, धाडसी निर्णयक्षमता आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा यांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणे ही अभिमानाची बाब आहे. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि महिला पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या या सन्मानामुळे चंद्रपूर पोलीस दलाचा गौरव वाढला असून, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.