हिंगणघाट येथील बिडकर महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
हिंगणघाट येथील बिडकर महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
हिंगणघाट (निखिल ठाकरे): येथील रा. सुं. बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून मराठी भाषेचा समृद्ध वारसा आणि भाषिक अस्मिता जपण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. बी. एम. राजुरकर यांनी मराठी भाषेच्या संवर्धनावर विशेष भर दिला. ते म्हणाले, “मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती संस्कारांची भाषा आहे. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचे वाचन करून आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे.”
प्रमुख अतिथी डॉ. एस. आर. विहिरकर यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या ऐतिहासिक वारशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही मराठीचे महत्त्व अबाधित असून ती जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. मनीषा रिठे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून मराठी साहित्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. “मराठी भाषेची गोडी जनमानसात रुजविणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे ओघवते व प्रभावी सूत्रसंचालन डॉ. कमलाकर नवघरे यांनी केले. मराठी साहित्यातील विविध उदाहरणांनी त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ‘पसायदान’ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.