कर्तव्य बजावताना अपघात, महामार्ग पोलीस अमलदाराचा मृत्यू,दोन मुलींचे पितृछत्र हरपले
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
चंद्रपूर : चंद्रपूर महामार्ग पोलीस विभागात कार्यरत असलेले पोलीस अमलदार दिगंबर धोंडिबा गुन्हाले (वय ३८) यांचे मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात त्यांच्या छातीला अंतर्गत दुखापत झाली होती. त्यांच्यावर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस विभागासह जिवती तालुक्यातील शेणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी कर्तव्य बजावत असताना महामार्ग पोलीस विभागाच्या वाहनाला अपघात झाला होता.
या अपघातात दिगंबर गुन्हाले यांच्या छातीला अंतर्गत मार लागला होता. त्यानंतर त्यांच्यावर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, १३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
दिगंबर धोंडिबा गुन्हाले हे दुर्गम जिवती तालुक्यातील शेणगाव येथील रहिवासी होते. अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या गुन्हाले यांनी पोलीस दलात सेवा बजावत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा त्यांनी दोन वेळा दिली; मात्र अवघ्या दोन-तीन गुणांनी त्यांना यशाने हुलकावणी दिली. परिस्थितीशी संघर्ष करत मोठे अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले.
कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातानंतर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. वडिलांचे छत्र हरपल्याने दोन्ही चिमुकल्या मुलींच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका सामान्य कुटुंबातून पुढे येत पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या दिगंबर गुन्हाले यांच्या अकाली निधनाने शेणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.