सेवासंकल्प अभियानांतर्गत वसमत येथील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान – जनसेवा से राष्ट्रसेवा’ या उपक्रमांतर्गत वसमत येथील ज्येष्ठ पत्रकारांचा त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेतील कार्याबद्दल पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अनवेकर मामा, विजय भाऊ, दगडू पंकज दासराव नांदापूरकर आणि पत्रकार मोईन कादरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि जनहिताच्या विषयांना प्रसिद्धी देणे, या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले.
पत्रकारिता हे केवळ वृत्तांकनाचे माध्यम नसून समाजातील सामान्य नागरिकांचे प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी साधन आहे. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, लोकशाहीत जनतेचा आवाज बुलंद करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, ही पत्रकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. वसमत येथील सन्मानित पत्रकारांनी आपल्या लेखणीतून वेळोवेळी जनतेचे प्रश्न मांडत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
‘सेवा संकल्प अभियान – जनसेवा से राष्ट्रसेवा’ या उपक्रमाच्या माध्यमातून समाजासाठी विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या वसमत येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आल्याने पत्रकारिता क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.
या सन्मानपत्रांवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सेवा संकल्प अभियानाचे संयोजक चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हा सन्मान आतिशभैय्या दांडेगावकर मित्रमंडळाच्या वतीने प्रदान करण्यात आला.
या गौरवामुळे सन्मानित पत्रकारांना समाजहिताचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. वसमत तालुक्यातील पत्रकार बांधव, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून अनवकर मामा, विजय भाऊ, दगडू पंकज दासराव नांदापूरकर व मोईन कादरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.