कारंजा उड्डाणपुलाच्या रंगरंगोटीचा मुहूर्त कधी?

Mon 05-Oct-2026,10:59 PM IST -07:00
Beach Activities

कारंजा उड्डाणपुलाच्या रंगरंगोटीचा मुहूर्त कधी?

तीन वर्षांपासून मागणी प्रलंबित; नागरी समस्या संघर्ष समितीचे गडकरींना स्मरणपत्र

नावेद पठाण, मुख्य संपादक वर्धा 

कारंजा (घाडगे) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा (घाडगे) शहरातील उड्डाणपुलाच्या रंगरंगोटी व देखभालीकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने केला आहे. उड्डाणपुलाची रंगरंगोटी करण्याच्या मागणीसाठी समितीने अपर तहसीलदार नृसिंह निंबेकर यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्मरणपत्र दिले.

कारंजा शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या उड्डाणपुलाची निर्मिती झाल्यापासून अद्याप रंगरंगोटी करण्यात आलेली नसल्याचे समितीने म्हटले आहे. यापूर्वी १० डिसेंबर २०२३ रोजी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथील जनता दरबारात नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उड्डाणपुलाच्या रंगरंगोटीची मागणी केली होती. मात्र, तीन वर्षांचा कालावधी लोटूनही या मागणीवर कार्यवाही झालेली नसल्याने समितीने पुन्हा स्मरणपत्र देत प्रश्न उपस्थित केला आहे.

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कारंजा हे महत्त्वाचे व वर्दळीचे ठिकाण आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पुलाची नियमित स्वच्छता, देखभाल, सौंदर्यीकरण आणि रंगरंगोटी केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असे समितीने म्हटले आहे.

उड्डाणपुलाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. तसेच अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी याच मार्गाने ये-जा करतात. त्यामुळे या महत्त्वाच्या उड्डाणपुलाच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे.

मागणी करूनही अद्याप कार्यवाही न झाल्याने आता नव्याने स्मरणपत्र देण्यात आले आहे. यानंतरही रंगकाम करण्यात आले नाही, तर नाईलाजाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा समितीने दिला आहे. स्मरणपत्र देताना कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.