१५ मिनिटांच्या रेस्क्यू ऑपरेशनने जीव वाचवला
१५ मिनिटांच्या रेस्क्यू ऑपरेशनने जीव वाचवला
नावेद पठाण मुख्य संपादक, वर्धा
वर्धा : दयालनगर परिसरात अजय हिराणी यांच्या घरासमोर एका गर्भवती श्वानाचे तोंड नाल्याच्या सिमेंटच्या गटार पाइपमध्ये अडकल्याची घटना घडली. उंदराचा पाठलाग करताना श्वान गटारात अडकल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेवक सुरेश गुलाबचंद आहुजा यांना माहिती देण्यात आल्यानंतर श्वानाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. अजय हिराणी यांनी तत्काळ गेडर मशीनची व्यवस्था करून बचावकार्याला सहकार्य केले.
सुमारे १५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर गर्भवती श्वानाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या बचावकार्यात सुरेश गुलाबचंद आहुजा, अजय हिराणी, कैलाश आहुजा, श्रीराम नागरिक बँकेचे चावरे बाबू, विशाल आहुजा, गौ रक्षा हिंदू दलाचे वर्धा जिल्हाध्यक्ष किशोर सोनी यांच्यासह नागरिकांनी सहकार्य केले.
नागरिकांच्या तत्परतेमुळे एका बेजुबान जीवाचा जीव वाचला. या सामूहिक बचावकार्याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.