हिंगणघाट घरफोडीचा छडा; दोघांना अटक

Thu 01-Oct-2026,10:23 PM IST -07:00
Beach Activities

हिंगणघाट घरफोडीचा छडा; दोघांना अटक

सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईलसह २.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधि इरशाद शाह वर्धा 

वर्धा : हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल असा एकूण २ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

फिर्यादी मनोज रामचंद्र गडवाल, रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट यांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पहाटे ४.४५ वाजता ते पत्नीसह ध्यानधारणेसाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. सकाळी ६.३० वाजता घरी परतल्यानंतर घराच्या कंपाउंडचे गेट व घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व दोन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १५४२/२०२६ अन्वये कलम ३०५(अ), ३३१(४) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर व्यक्ती राकेश बेनीराम पाचे (३०), रा. पिपरी मेघे, वर्धा असल्याचे समोर आले. त्यानंतर तो इदगाह मैदान, वर्धा येथे मित्रासह असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे राकेश बेनीराम पाचे (३०), रा. पिपरी मेघे, वर्धा आणि आकाश रमेश देवतळे (३४), रा. तारफैल, वर्धा अशी आहेत. चौकशीत राकेश पाचे याने आकाश देवतळे याच्या साथीने हिंगणघाट येथे घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून पदक असलेले, पिवळ्या-काळ्या मण्यांत गुंफलेले सुमारे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, किंमत २ लाख ४ हजार रुपये, तसेच ओपो कंपनीचा निळ्या रंगाचा अँड्रॉइड मोबाईल, किंमत ५ हजार रुपये, असा एकूण २ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल इंटेकार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सचिन इंगोले, भूषण निघोट, विक्रम काळमेघ, धर्मेंद्र अकाली, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, जगदीश डफ आणि दिनेश बोथकर, रितेश गेटमे यांनी केली.