तीन वर्षांपासून फरार आरोपी नोएडातून जेरबंद
तीन वर्षांपासून फरार आरोपी नोएडातून जेरबंद
बियाणे व डिस्ट्रिब्युटरशिपच्या आमिषाने शेतकरी, व्यापाऱ्यांची फसवणूक; सात दिवसांच्या शोधमोहिमेनंतर वर्धा शहर डीबी पथकाची कारवाई
नावेद पठाण मुख्य संपादक, वर्धा
वर्धा : शेतकरी व व्यापाऱ्यांना शेतीमाल व बियाणे खरेदी-विक्री व्यवसायासाठी विविध परवाने तसेच डिस्ट्रिब्युटरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन वर्षांपासून पाहिजे असलेल्या आरोपीला वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उत्तर प्रदेशातील नोएडा येथून ताब्यात घेतले.
जसवंत सिंग (वय ३९, रा. तमेरी, ता. जसवंतनगर, जि. इटावा, उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वर्धा शहर पोलिस ठाण्यात २८ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा क्रमांक १६७४/२०२३, कलम ४२०, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल आहे.
आरोपीने शेतकरी व व्यापाऱ्यांना शेतीमाल व बियाणे खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध परवाने व डिस्ट्रिब्युटरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखविले. तसेच या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
आरोपीच्या शोधासाठी यापूर्वी चार वेळा पोलिस पथके रवाना करण्यात आली होती. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत ठिकाणे बदलत होता. अखेर पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने सलग सात दिवस उत्तर प्रदेश व दिल्ली परिसरात शोधमोहीम राबविली. दिल्ली, नोएडा तसेच आरोपीचे मूळ गाव तमेरी, जसवंतनगर, रजमउ, बैदपूरा आदी ठिकाणी माहिती संकलित करण्यात आली. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीच्या हालचालींचा माग काढत पथकाने सेक्टर १६८, नोएडा येथे त्याचा ठावठिकाणा निश्चित केला. त्यानंतर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंट प्राप्त करण्यात आले असून, त्याला वर्धा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
तपासादरम्यान आरोपीविरुद्ध वर्धा शहर, हिंगणघाट तसेच राजुरा, जि. चंद्रपूर येथील काही प्रकरणांत अजामीनपात्र वॉरंट प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील इतर पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत का, तसेच न्यायालयीन अजामीनपात्र वॉरंट प्रलंबित आहेत का, याचीही पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, घनशाम जाधव, पोलिस हवालदार महेंद्र पाटील, अभिजित वाघमारे, पोलिस अंमलदार रंजीत भुरसे, अमोल साळवन तसेच सायबर सेलचे पोलिस हवालदार अक्षय राऊत यांनी सहभाग घेतला.