शालेय साहित्य पुरवठा म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणे : श्यामसुंदर राठी
शालेय साहित्य पुरवठा म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणे : श्यामसुंदर राठी
नवजीवन छात्रालयात शैक्षणिक व जीवनोपयोगी साहित्य वितरण सोहळा
वर्धा : नावेद पठाण मुख्य संपादक
पुस्तके, वही, लेखन साहित्य यांसारख्या शालेय साधनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी निर्माण होते. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे मुलांच्या शिक्षणापेक्षा दैनंदिन गरजांकडे अधिक लक्ष दिले जाते. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक शालेय साहित्याकडे दुर्लक्ष होते. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, अशी मदत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ठरते, असे प्रतिपादन आर्वी येथील ज्येष्ठ समाजसेवक श्यामसुंदर राठी यांनी केले.
ते ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम व श्यामसुंदर राठी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ फेब्रुवारी रोजी नवजीवन छात्रालय येथे आयोजित शैक्षणिक व जीवनोपयोगी साहित्य वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन नवजीवन छात्रालयाचे सचिव तथा प्राचार्य विजय व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुलढाणा अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक राजेश बगाडे, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, राष्ट्रीय सचिव किरण फुलझेले, सेंट थॉमस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्रिती विजय सत्यम, स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष विलास कुळकर्णी, आदर्श शिक्षक मोहन मोहिते, फोरमचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजू लभाणे, जिल्हाध्यक्ष संतोष तुरक, प्रदेश संघटक हरीष तांदळे, संजय मिश्रा, अब्दुल गनी, संजय बी., गिरीश राठी बोंडे, विक्रांत गव्हाणे, आकाश तोडासे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्या अहिंसा, समता व सेवा या तत्त्वांवर आधारित असलेल्या नवजीवन छात्रालयात हा उपक्रम राबविणे प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे नमूद करत, गांधीजींच्या विचारांना मानवंदना देण्याच्या उद्देशाने या ठिकाणाची निवड करण्यात आल्याची भावना इमरान राही यांनी प्रस्तावनेत व्यक्त केली.
या वेळी विजय व्यास, राजेश बगाडे, प्रिती सत्यम व विलास कुळकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते छात्रालयातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच ब्लँकेटचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक इमरान राही, संचालन हरीष तांदळे, तर आभार प्रदर्शन विक्रांत गव्हाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्यन छापेकर, मिहीर वाघ, प्रेम कावर, अहसान राही, राजेश धोपटे, श्रीकांत पवार, दिलीप उईके, धनंजय खेडकर, नामदेव अखाडे आदींनी परिश्रम घेतले.