बुद्ध जयंती उत्साहात साजरी,धम्मक्रांतीला समर्पित राहण्याचे भन्ते बुद्धभूषण यांचे आवाहन.

Sat 02-May-2026,09:02 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली वसमत येथील हर्ष नगर संबोधी बुद्ध विहार जयंती मंडळाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित धम्म देशनेत भन्ते बुद्धभूषण यांनी भगवान बुद्धांच्या जीवनातील वैशाख पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित केले.

​वैशाख पौर्णिमेचा त्रिविध संगम

भन्ते बुद्धभूषण म्हणाले की, "भगवान बुद्धांचा जन्म, त्यांना प्राप्त झालेले बुद्धत्व (ज्ञानप्राप्ती) आणि त्यांचे महापरिनिर्वाण या तिन्ही महत्त्वपूर्ण घटना वैशाख पौर्णिमेलाच घडल्या आहेत. बुद्धांनी दिलेला दुःखमुक्तीचा मार्ग हा जाती-पातीचा आणि भेदभावाचा नसून तो सर्वांसाठी समान आहे." यावेळी त्यांनी महामाया देवीचे स्वप्न, सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग, सुजाताने दिलेली खीर आणि कुशीनगर येथील महापरिनिर्वाण या प्रसंगांवर प्रकाश टाकला.

​विविध उपक्रमांचे आयोजन

कार्यक्रमाची सुरुवात पंचरंगी ध्वजारोहणाने झाली. भन्ते बुद्धभूषण यांनी उपासकांना त्रिशरण, पंचशील आणि बुद्ध वंदना दिली. जयंती मंडळाच्या वतीने भंतेंना 'चीवर दान' करण्यात आले. विशेष म्हणजे, शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला ॲड. रणधीर तेलगोटे, खंडोजी पंडित, डॉ. नामदेव मुळे, आर. एस. नंद, राहुल धायजे, विकास कांबळे, भूषण कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम धायजे यांनी केले असून, उपस्थितांना 'खीर दान' करण्यात आले.