शिक्षण बुद्धी देते, तर संस्कार हृदय घडवतात : ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही
शिक्षण बुद्धी देते, तर संस्कार हृदय घडवतात : ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही
सत्याश्रम मंडळाच्या १५ दिवसीय संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
बोरगाव मेघे "शिक्षण आणि संस्कार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिक्षण माणसाला बुद्धी देते, तर संस्कार त्याला संवेदनशील हृदय देतात. संस्कार शिबिरे ही खऱ्या अर्थाने माणूस घडविण्याची कार्यशाळा असून नव्या पिढीला जीवनमूल्ये, शिस्त आणि समाजात जगण्याची कला शिकविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अशा शिबिरांद्वारे केले जाते," असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही यांनी केले.
स्थानिक बोरगाव मेघे येथील सत्येश्वर सभागृहात सत्याश्रम मंडळातर्फे आयोजित १५ दिवसीय संस्कार शिबिराच्या समारोप समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ३० मे रोजी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी सत्याश्रमच्या संचालिका साध्वी सत्यमित्रा या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन मोहिते, सेंट थॉमस स्कूलचे संचालक विजय सत्याम व सागर फोडेकर, शिबिराचे संयोजक संदीप जोशी, पूजा गोसटकर आणि सावरी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर शिबिरातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्ये तसेच आत्मसंरक्षणाचे धडे देणारी कराटेची प्रात्यक्षिके विशेष आकर्षण ठरली. शिबिरादरम्यान शिकलेल्या विविध कौशल्यांचे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सादरीकरण केले. त्यामुळे उपस्थित पालक व नागरिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
१५ दिवसांच्या या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. समारोपप्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, पदके व स्मृतिचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अपर्णा डफले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शबाना शेख यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आदित्य साटोने, साहिल सिंह, ललिन नेवारे तसेच पालकवर्गाने विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे हा संस्कार शिबिर उपक्रम यशस्वीपणे पार पडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.