चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शेतात आढळला मृतदेह

Fri 27-Nov-2026,10:43 PM IST -07:00
Beach Activities

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शेतात आढळला मृतदेह

वडणेर येथील अरुण मेश्राम यांच्या मृत्यूने परिसरात खळबळ

वडणेर (प्रतिनिधी, नाजिम खान)

वडणेर येथील अरुण मारोती मेश्राम (वय ४५) हे सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह साई मंगल कार्यालयाजवळील मोहन लोहकरे यांच्या शेतात आढळून आला. या घटनेमुळे वडणेर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण मेश्राम हे घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्यांचा शोध न लागल्याने मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर रोजी वडणेर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, गुरुवारी शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वडणेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून, पुढील तपास वडणेर पोलीस करीत आहेत.