रोटरी क्लब वसमतच्या अध्यक्षपदी श्याम डिंगुळकर,नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथे रोटरी क्लब वसमतच्या वर्ष २०२६–२७ च्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी शहरातील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी माजी अध्यक्ष रणधीर तेलगोटे यांनी आपल्या यशस्वी कार्यकाळानंतर अध्यक्षपदाची धुरा नवनिर्वाचित अध्यक्ष श्याम डिंगुळकर यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द केली. तसेच ज्ञानदेव गुट्ठे यांनी क्लबच्या सचिवपदाचा पदभार स्वीकारला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर श्याम डिंगुळकर यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजहित, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि विविध सेवाभावी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांना जोडून लोककल्याणाच्या दिशेने कार्य करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी अध्यक्ष रणधीर तेलगोटे यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचा आढावा घेत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास दीपक जयस्वाल, तानाजी भोसले, शंकर कदम, सतीश महागावकर, बालासाहेब महागावकर, सुभाष लालपोतु, विपुल डिंगुळकर, नामदेव दळवी, शिंदे ताई, देशमुख ताई यांच्यासह नांदेड येथील रोटरी क्लबचे पदाधिकारी व अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली रोटरी क्लब वसमत समाजोपयोगी प्रकल्प अधिक व्यापक प्रमाणात राबवेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. उत्साहपूर्ण वातावरणात आणि टाळ्यांच्या गजरात पदग्रहण सोहळ्याची सांगता झाली.