शक्तीपीठ महामार्गाविरोधात वसमतमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेती जमीन उद्ध्वस्त होणार असून हजारो शेतकरी भूमिहीन होण्याच्या भीतीत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी वसमत येथे शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने बाधित शेतकरी, महिला, युवक, युवती तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
तालुक्यातील विविध गावांमधून सकाळपासूनच शेतकरी वसमत शहरात दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सर्व आंदोलक एकत्र जमल्यानंतर तेथून उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला. “शेतकरी एकजुटीचा विजय असो”, “शक्तीपीठ महामार्ग रद्द करा”, “शेती वाचवा, शेतकरी वाचवा” अशा तीव्र घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलकांच्या हातात निषेधाचे फलक झळकत होते. काही काळ शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शेतकरी नेत्यांनी शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका करत शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या विनाशाचा प्रकल्प असल्याचा आरोप केला. प्रस्तावित महामार्गासाठी संपादित होणारी जमीन अत्यंत सुपीक असून अनेक ठिकाणी बारमाही ओलिताखाली शेती केली जाते. या जमिनी गेल्यास शेतकरी कुटुंबांचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भावना वक्त्यांनी व्यक्त केली.
सभेत बोलताना शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध दर्शवत “हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली. “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे विस्थापन मान्य नाही. केवळ वाढीव मोबदला नको, तर प्रकल्पच रद्द झाला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी महिला व शेतकन्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. अनेक युवतींनी भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत, “शेती हाच आमच्या कुटुंबाचा एकमेव आधार आहे. जमीन गेल्यास पुढील पिढ्यांचे भविष्य अंधारात जाईल,” अशी भीती व्यक्त केली. “आम्ही रक्ताचे पाणी करून शेती उभी केली आहे. विकास हवा, पण शेतकऱ्यांच्या बळीवर नाही,” अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या.
हिंगोली जिल्हा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या मोर्चात तानाजी भोसले, नवनाथ पाटील, नामदेव दळवी, शिवाजी भालेराव, सीताराम जाधव, दिनेश हनुमंते, गोरख चव्हाण, हनुमंत राजेगोरे, आलोक इंगोले यांच्यासह शिवसेना, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी, प्रहार, मराठा सेवा संघ आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा सुमारे ८०० किलोमीटर लांबीचा सहापदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे प्रस्तावित आहे. राज्यातील तुळजापूर, माहूर आणि कोल्हापूर येथील शक्तीपीठांना जोडण्याचा उद्देश या प्रकल्पामागे असल्याचे सांगितले जाते. हा महामार्ग १२ जिल्हे, २९ तालुके आणि सुमारे ३७० गावांमधून जाणार असल्याची माहिती आहे. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असला तरी हजारो एकर सुपीक जमीन बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मोर्चानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. “शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत तातडीने पोहोचवण्यात येतील,” असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
दरम्यान, मोर्चामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. या एल्गार मोर्चामुळे शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचा आक्रोश अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले