देवळी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात बसपाचे आंदोलनाचे संकेत; १५ दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
देवळी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात बसपाचे आंदोलनाचे संकेत; १५ दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वर्धा / देवळी | प्रतिनिधी : युसूफ पठाण
देवळी तालुक्यातील टाकळी (चनाजी)–चिंचाळा तसेच सरूळ–टाकळी (चनाजी) या ग्रामीण रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी, विद्यार्थी व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या वर्धा जिल्हा युनिटने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत रस्त्यांचे तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी केली.
जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (क्र. २) यांच्या कार्यकारी अभियंत्यांनाही निवेदनाची प्रत सादर केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, टाकळी (चनाजी), चिंचाळा व सरूळ या गावांना जोडणारे रस्ते हजारो शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, देखभालीअभावी रस्ते पूर्णपणे उखडले असून मोठमोठे खड्डे व चिखलामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. त्यामुळे शेतमाल बाजारात नेणे, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे आणि रुग्णांना दवाखान्यात पोहोचवणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात रुग्णवाहिकांनाही गावात पोहोचणे अवघड होत असून एसटी बससेवाही बंद पडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बसपाने प्रशासनाकडे दोन्ही रस्त्यांची तात्काळ पाहणी करून डांबरीकरण व मजबुतीकरणाची कामे सुरू करण्याची, तसेच कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे यांनी, "ग्रामीण नागरिकांना चांगले रस्ते हा मूलभूत हक्क आहे. शासनाने १५ दिवसांच्या आत कामाला सुरुवात केली नाही, तर बहुजन समाज पार्टी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल," असा इशारा दिला.
या निवेदनासोबत टाकळी (चनाजी), चिंचाळा व सरूळ येथील शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदनही जोडण्यात आले. निवेदन देताना सुनील भगत, किशोर मेंढे, मंदाताई नाखले, माणिक मून, रमेश मेंढे, प्रकाश नाईक, हंसराज पाटील, जानराव ठोंबरे, निखिल भगत, पुष्पा शिवरकर, अश्विनी इंगोले, वैशाली कांबळे, प्रगती पाल, मिराबाई ओंकार, सुषमा पाल, अनुसया उईके, सुगंधाबाई डुकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.