वर्धा कामगार कल्याण मंडळातील कथित अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी; आठ बांधकाम कामगार संघटनांचे संयुक्त निवेदन
वर्धा कामगार कल्याण मंडळातील कथित अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी; आठ बांधकाम कामगार संघटनांचे संयुक्त निवेदन
वर्धा | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील आठ बांधकाम कामगार संघटनांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वर्धा कार्यालयातील कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदवत सरकारी कामगार अधिकारी सीमा शिंदे यांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील संयुक्त निवेदन मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, मुख्य सचिव, कामगार आयुक्त तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या अर्जांच्या मंजुरी प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याच्या अनेक तक्रारी संघटनांकडे प्राप्त झाल्या आहेत. कार्यालयातील शासकीय कामकाज कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचा तसेच संगणक प्रणालीचा वापर नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज, संगणक लॉग्स आणि डिजिटल नोंदींची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, मागील १५ दिवसांत मोठ्या प्रमाणावर काही अर्ज मंजूर करण्यात आले, तर अनेक पात्र कामगारांचे अर्ज नामंजूर झाल्याच्या तक्रारी आहेत. अर्ज मंजुरी प्रक्रियेत कथित आर्थिक गैरव्यवहार, मध्यस्थांचा हस्तक्षेप तसेच संघटना प्रतिनिधींशी अयोग्य वर्तन झाल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यापूर्वी नोंदविण्यात आलेल्या एका फौजदारी प्रकरणाचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संयुक्त निवेदनाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची वेळबद्ध चौकशी, मागील १५ दिवसांतील मंजूर व नामंजूर अर्जांचे विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट), डिजिटल फॉरेन्सिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुरावे सुरक्षित ठेवणे, दोषी आढळल्यास कठोर विभागीय व कायदेशीर कारवाई तसेच पात्र कामगारांचे नामंजूर अर्ज पुन्हा तपासून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास वर्धा जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार संघटना संविधानिक मार्गाने आंदोलन, धरणे, ठिय्या आंदोलन व उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
हे संयुक्त निवेदन स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना, संकल्प बांधकाम मजूर कामगार संघटना, यश असंघटित कामगार संघटना, राणी दुर्गावती बांधकाम कामगार संघटना, वर्धा जिल्हा निवारा बांधकाम कामगार संघटना, न्यू युवाशक्ती बांधकाम कामगार संघटना, संत भाकरे महाराज कामगार संघटना आणि इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त वतीने सादर करण्यात आले आहे.