DBPL कन्स्ट्रक्शनच्या कथित हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे पाच वर्षांपासून नुकसान; कारवाईची मागणी

Fri 03-Jul-2026,01:51 AM IST -07:00
Beach Activities

DBPL कन्स्ट्रक्शनच्या कथित हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे पाच वर्षांपासून नुकसान; कारवाईची मागणी

देवळी | विशेष प्रतिनिधी (युसूफ पठाण)

रत्नापूर येथील शेतकरी बंटी ऊर्फ हरिष अशोकराव खडसे यांनी DBPL कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कथित हलगर्जीपणामुळे गेल्या पाच वर्षांपासून आपल्या शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाला लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा संबंधित शासकीय विभाग व राज्य शासनाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकरी खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नापूर परिसरातील रस्ता बांधकामानंतर मोबाईल टॉवरपासून रत्नापूर पुलापर्यंत येणारे पावसाचे पाणी त्यांच्या शेतात साचत आहे. त्यामुळे सहा एकर शेतीपैकी सुमारे दोन ते अडीच एकर क्षेत्र दरवर्षी पाण्याखाली जात असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी कंपनीकडे अनेकदा तोंडी तक्रारी करून पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली बांधण्याची तसेच रस्त्याच्या कामादरम्यान काढण्यात आलेले सिमेंटचे पाईप पुन्हा बसविण्याची मागणी केली होती. मात्र, कंपनीने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे.

न्याय मिळावा यासाठी शेतकरी बंटी खडसे यांनी कंपनीला लेखी निवेदन सादर केले असून, तातडीने कार्यवाही न झाल्यास पटवारी, तहसीलदार देवळी, देवळी पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी वर्धा तसेच मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कृषी मंत्री यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनीही शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित कंपनीने पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी केली आहे.