टाकरखेडा येथे ‘संवाद’ उपक्रम संपन्न; पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या
टाकरखेडा येथे ‘संवाद’ उपक्रम संपन्न; पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या
वर्धा | प्रतिनिधि इरशाद शाह
वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा ‘संवाद’ उपक्रम आर्वी पोलीस ठाण्याअंतर्गत टाकरखेडा येथील संत लाहनुजी महाराज संस्थान येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
या बैठकीत पोलीस विभागासह महसूल, पंचायत समिती, आरोग्य, कृषी, महावितरण, वन विभाग आदी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे नागरिकांना विविध विभागांशी संबंधित समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली.
यावेळी टाकरखेडा व परिसरातील सुमारे ३०० ते ४०० नागरिक व लोकप्रतिनिधींनी गावात पोलीस चौकीची स्थापना, आर्वी–टाकरखेडा रस्त्याची दुरुस्ती, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करणे तसेच बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेल्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठ्याची समस्या पुढील आठ दिवसांत सोडविण्याचे तसेच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच स्थानिक पोलिसांना अवैध धंदे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
गावातील कोणत्याही अवैध धंद्याची किंवा संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना गोपनीयपणे देण्याचे आवाहन करत माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास आणि सहकार्य वाढल्यास गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, तहसीलदार हरिश काळे, संत लाहनुजी महाराज संस्थानचे सचिव सतीशभाऊ ठाकरे, आर्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर, वन विभागाचे अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलाच्या ‘संवाद’ उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ होत असल्याचे यावेळी दिसून आले.