बल्लारपूरात स्मार्ट मीटरवरून जनआक्रोश, ७ दिवसांत कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोनाचा इशार

Thu 02-Jul-2026,09:20 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बल्लारपूर शहरात महावितरणकडून बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांचा रोष तीव्र होत असून, बल्लारपूर कृती समितीने कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, बल्लारपूर यांना सविस्तर निवेदन सादर करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. उपभोक्त्यांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे, त्यानंतर अनेकपटीने वाढीव वीजबिले देणे, सामान्य मीटर उपलब्ध करून न देणे तसेच ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. सात दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

समितीने दिलेल्या निवेदनानुसार, शहरात महावितरणच्या ठेकेदारांकडून नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा लेखी संमती न घेता घरांमधील जुने व कार्यरत वीजमीटर काढून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. विद्युत कायदा आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी) नियमांनुसार मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकाला सूचना देणे व त्याची संमती घेणे आवश्यक असताना या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर शहरातील अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा तीन ते चारपट जास्त रकमेची वीजबिले मिळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. केवळ एक-दोन पंखे आणि काही एलईडी दिवे वापरणाऱ्या घरांनाही दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंतची बिले आली आहेत. दोन ते तीन महिने बंद असलेल्या घरांनाही पाच ते सात हजार रुपयांची बिले मिळाल्याचा दावा समितीने केला आहे. पूर्वी दीड ते दोन हजार रुपये येणारे मासिक वीजबिल आता आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्याने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमध्ये तांत्रिक दोष किंवा कॅलिब्रेशनमध्ये गंभीर त्रुटी असल्याची शंका समितीने व्यक्त केली आहे.

याशिवाय, जुने मीटर खराब झाल्यानंतर नवीन सामान्य मीटर उपलब्ध नसल्याचे सांगून ग्राहकांना केवळ स्मार्ट मीटरच स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी डिजिटल मीटर अनिवार्य केल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, सोलर पॅनेल असलेल्या घरांनाही मोठ्या रकमेची वीजबिले येत असल्याचा मुद्दाही समितीने उपस्थित केला आहे.

महावितरणच्या या धोरणामुळे गरीब, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक शोषण होत असून, वीजसारख्या अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बल्लारपूर कृती समितीने महावितरणकडे सात प्रमुख मागण्या केल्या आहेत. उपभोक्त्यांच्या संमतीशिवाय बसविण्यात आलेले सर्व स्मार्ट मीटर तातडीने काढून त्यांच्या जागी पूर्वीप्रमाणे सामान्य मीटर बसविणे, गेल्या तीन महिन्यांतील वाढीव वीजबिलांची विभागीय पथकाकडून निष्पक्ष चौकशी करून दुरुस्ती करणे, ग्राहकांच्या लेखी मागणीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविणे, खराब मीटरच्या बदल्यात सामान्य मीटर उपलब्ध करून देणे, स्मार्ट मीटरधारकांची माहिती कृती समितीला देणे, जुन्या मीटरचे नियमित रीडिंग पुन्हा सुरू करणे तसेच संबंधित दोषी ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणे, अशा मागण्यांचा त्यात समावेश आहे.

या गंभीर प्रश्नावर सात दिवसांच्या आत समाधानकारक निर्णय न घेतल्यास बल्लारपूर शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्ष व संघटनांना सोबत घेऊन महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, विधान परिषदेचे सदस्य, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

बल्लारपूर कृती समितीच्या वतीने नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, गटनेते अब्दुल करीम, नगरसेवक सिक्की यादव, कुतुबुद्दीन सिटी , प्रशांत झामरे, भारत थुलकर, भास्कर माकोडे, मंगेश बावणे, उमेश कडू, रवि पुप्पलवार, रोहित चुटे, नरेश मुंदडा, पत्रकार रमेश निषाद, सय्यद अफजल अली यांच्यासह विविध सामाजिक, व्यापारी व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे