दारूच्या नशेत मालवाहू वाहन चालविणाऱ्या चालकावर कारवाई; वाहन जप्त विशेष नाकाबंदी मोहिमेत वाहतूक पोलिसांची कारवाई
दारूच्या नशेत मालवाहू वाहन चालविणाऱ्या चालकावर कारवाई; वाहन जप्त
विशेष नाकाबंदी मोहिमेत वाहतूक पोलिसांची कारवाई
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
दि. 27 जून 2026 : वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविणे आणि नागरिकांकडून वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात ब्रेथ अॅनालायझरच्या साहाय्याने वाहनांची तपासणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान वर्धा शहरातील बसस्थानक परिसरात मार्शल पेट्रोलिंग पथकातील पोलीस कर्मचारी सय्यद, मुकेश राऊत, चंद्रकांत चेक, आरिफ खान व दिलीप कामडी यांनी वाहन तपासणी केली. त्यावेळी एमएच-32-एजे-6552 क्रमांकाच्या मालवाहू वाहनाचा चालक संकेत ज्ञानेश्वरराव भोयर (वय 27, रा. नागपूर) याला संशयावरून थांबविण्यात आले.
प्राथमिक तपासणीनंतर चालकास वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथे आणून ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. तपासणीत त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 326.8 मिलीग्रॅम टक्के आढळून आले. यानंतर संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये गुन्हा नोंदवून मालवाहू वाहन जप्त करण्यात आले.
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2026 मध्ये आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे 163 गुन्हे नोंदविण्यात आले असून 57 वाहनचालक परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच हेल्मेट न वापरणाऱ्या 2,249 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, मोटार वाहन कायद्याच्या कलम 66(1)/192(अ) अंतर्गत अवैध प्रवासी वाहतुकीचे 99 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा तसेच चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट बंधनकारकपणे लावावा, असे आवाहन केले आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास रस्ते अपघात टाळण्यास मोठी मदत होईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.