एनसीसी कॅडेट्सना वाहतूक सुरक्षेचे धडे; सेवाग्राम येथे जनजागृती कार्यशाळा
एनसीसी कॅडेट्सना वाहतूक सुरक्षेचे धडे; सेवाग्राम येथे जनजागृती कार्यशाळा
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कॅम्पमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 200 ते 275 एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.
कार्यशाळेची सुरुवात सडक सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मोटारसायकल चालविताना वैध वाहन परवाना (लायसन्स) बाळगणे, हेल्मेटचा वापर करणे, चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. याशिवाय वाहन चालविताना तंबाखू, गुटखा, सिगारेट किंवा इतर कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन टाळण्याचे आवाहन करण्यात आले. अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आपत्कालीन परिस्थितीत वापरावयाच्या पोलीस मदत क्रमांक 112, रुग्णवाहिका सेवा 108 तसेच महिला व बालक हेल्पलाईन 1098 यांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
ही कार्यशाळा वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेस एनसीसी अधिकारी अजय कुमार तुरा सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षेचे नियम पाळून स्वतःसह इतरांच्या जीविताचे संरक्षण करण्याचा संकल्प यावेळी केला.