भाजयुमोतर्फे आणीबाणीवरील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव व लोकशाही रक्षकांचा गौरव संपन्न

Tue 30-Jun-2026,02:58 AM IST -07:00
Beach Activities

भाजयुमोतर्फे आणीबाणीवरील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव व लोकशाही रक्षकांचा गौरव संपन्न

वर्धा | युसूफ पठाण

भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) वर्धा जिल्हाच्या वतीने स्थानिक ओएसजी टेबल टेनिस अकॅडमी येथे "आणीबाणी – लोकशाहीचा काळा दिवस" या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि आणीबाणी सेनानींचा गौरव कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, भाजपा मुख्यालय प्रभारी श्रीधर देशमुख, जिल्हा महामंत्री अशोक कलोडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली येरावार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, भाजपा वर्धा शहराध्यक्ष निलेश किटे, महिला मोर्चा शहराध्यक्षा निता सूर्यवंशी यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत १५ ते ३० वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आणीबाणीचा इतिहास, लोकशाही मूल्यांचे महत्त्व, भारतीय संविधानाचे संरक्षण आणि नागरिकांची जबाबदारी या विषयांवर अभ्यासपूर्ण व प्रभावी मते मांडली. परीक्षक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ श्याम देशपांडे, सिनेट सदस्य रोशनी खेलकर आणि निलेश मुंजे यांनी स्पर्धकांचे मूल्यमापन केले.

स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून श्रावणी इटनकर यांनी प्रथम, नंदिनी देशमुख यांनी द्वितीय, भूमिका चौबे यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तर शंतनू वाटकर यांना प्रोत्साहन पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली.

यावेळी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध स्पर्धात्मक क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या सेनानींचा विशेष सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना लोकशाही, संविधान आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व सांगत राष्ट्रहित सर्वोच्च मानून कार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजयुमो जिल्हा सचिव शिवा डुकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.