दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांचा दणका; दोन वाहने जप्त
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांचा दणका; दोन वाहने जप्त
वर्धा | प्रतिनिधी (युसूफ पठाण)
वर्धा जिल्ह्यात रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान मंगळवारी दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या दोन चालकांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त करण्यात आली.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर ब्रीथ ॲनालायझरद्वारे विशेष नाकाबंदी करण्यात आली. वर्धा शहरातील इटवारा चौक येथे मार्शल पथकाने वाहन तपासणीदरम्यान दुचाकी क्रमांक MH-32-S-5938 चालक कावदुजी यादवराव धुर्वे (वय 44, रा. सिंदी मेघे, वर्धा) हे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना आढळले. ब्रीथ ॲनालायझर तपासणीत त्यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 114.1 मिलीग्रॅम टक्के आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
तसेच, ऑटो क्रमांक MH-32-AK-2587 चालक पंकज सुरेशराव भोयर (वय 34, रा. म्हसाळा, वर्धा) हेही मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 379.7 मिलीग्रॅम टक्के आढळल्याने त्यांच्याविरुद्धही मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये गुन्हा नोंदवून वाहन जप्त करण्यात आले.
वाहतूक नियंत्रण शाखेच्या माहितीनुसार, 2026 या वर्षात आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे 165 गुन्हे, 59 परवाना निलंबन प्रस्ताव, हेल्मेट न वापरण्याचे 177 गुन्हे तसेच कलम 66(1)/192(अ) अंतर्गत 102 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना दारू पिऊन वाहन न चालविण्याचे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि चारचाकी चालकांनी सीटबेल्टचा अनिवार्य वापर करण्याचे आवाहन केले आहे.