पूलफैल चौकात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या युवकाला अटक; वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई
पूलफैल चौकात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या युवकाला अटक; वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई
वर्धा | प्रतिनिधी (युसूफ पठाण)
वर्धा शहरातील पूलफैल चौक परिसरात हातात धारदार लोखंडी तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने शिताफीने अटक केली. आरोपीकडून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी.बी. पथक पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरामार्फत पूलफैल चौकात एक युवक हातात तलवार घेऊन मोठमोठ्याने ओरडत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला घेराव घालून ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव प्रज्वल उर्फ पज्या सुभाष चचाणे (वय 27, रा. पूलफैल, वर्धा) असे सांगितले. पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. संपूर्ण कारवाईची ई-साक्ष ॲपद्वारे व्हिडिओग्राफी व छायाचित्रण करण्यात आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 923/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड तसेच पोलीस अंमलदार महेंद्र पाटील, अभिजीत वाघमारे, रंजीत भुरसे आणि अमोल साळवन यांनी सहभाग घेतला.