प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्रेत्यावर अल्लीपूर पोलिसांची कारवाई; 17 हजार 547 रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्रेत्यावर अल्लीपूर पोलिसांची कारवाई; 17 हजार 547 रुपयांचा मुद्देमाल जप्त
अल्लीपूर | तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे
अल्लीपूर पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत धोत्रा येथील एका व्यक्तीच्या घरावर छापा टाकून 17 हजार 547 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू व स्वीट सुपारीचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून ही कारवाई दि. 14 जून रोजी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संदीप सोनुले (रा. धोत्रा) असे आहे. संदीप सोनुले यांच्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा असल्याची गोपनीय माहिती अल्लीपूर पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधिताच्या घरावर धाड टाकली.
कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. संयुक्त पथकाने घराची झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित करण्यात आलेला सुगंधी तंबाखू तसेच अन्य प्रतिबंधित स्वीट सुपारीचा साठा आढळून आला. यामध्ये एकूण 17 हजार 547 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपी संदीप सोनुले याच्याविरुद्ध अल्लीपूर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशानुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव डॉ. वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार संगीता हेलोंडे, पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदुळकर, पोलीस हवालदार अजय वानखेडे, अजय रिठे, पंकज कापसे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे पियुष मानवटकर, हुमा पिपरे आणि मंगेश पराळे यांनी सहभाग घेतला.
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.