सावंगी (मेघे) पोलिसांची मोठी कारवाई; २८ लिटर गावठी मोहाची दारू व दुचाकीसह ₹१.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सावंगी (मेघे) पोलिसांची मोठी कारवाई; २८ लिटर गावठी मोहाची दारू व दुचाकीसह ₹१.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
सावंगी (मेघे) पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत २८ लिटर गावठी मोहाची दारू व एक दुचाकी असा एकूण ₹१ लाख १५ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वर्ध्यातील बजाज चौक येथील भाजी मंडई परिसरातील रहिवासी गोपी रमेश वैश्वर (वय ५६) हा त्याच्या एमएच-३२-एवाय-८३९२ क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या सुजुकी ॲक्सेस दुचाकीवरून सिखवेडा येथून राजीव नगरकडे अवैध गावठी मोहाची दारू घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सावंगी (मेघे) पोलिसांनी पंच व टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सिखवेडा–सावंगी (मेघे) मार्गावरील ड्रीमलँड सिटी गेटजवळ नाकाबंदी केली. काही वेळाने संशयित दुचाकी तेथे आल्यानंतर पोलिसांनी ती थांबवून पंचांसमक्ष झडती घेतली. दुचाकीच्या पुढील भागात व डिकीत ठेवलेल्या दोन प्लास्टिकच्या डब्यांमधून २८ लिटर गावठी मोहाची दारू आढळून आली.
या कारवाईत ₹१,१०,००० किमतीची सुजुकी ॲक्सेस दुचाकी व ₹५,६०० किमतीची गावठी मोहाची दारू असा एकूण ₹१,१५,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक विनोद गिरी यांच्या नेतृत्वात पोहेवा अभय खोबरागडे, पोशी श्याम सलामे व पोशी गौरव नर्तम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.