अल्लीपूर परिसरात अमली पदार्थांच्या विक्रीचा आरोप; नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी

Sat 04-Jul-2026,01:07 AM IST -07:00
Beach Activities

अल्लीपूर परिसरात अमली पदार्थांच्या विक्रीचा आरोप; नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी

अल्लीपूर | ता. प्रतिनिधी : सुनील हिंगे

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर परिसरात अमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये एमडीसारख्या अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून, याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

अल्लीपूर हे हिंगणघाट तालुक्यातील प्रमुख गाव असून पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ४२ गावांचा समावेश आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील अवैध दारूची विक्री काही प्रमाणात कमी झाली असली तरी अमली पदार्थांची विक्री वाढल्याचे चित्र आहे. विशेषतः धोत्रा चौक आणि अल्लीपूर बसस्थानक परिसरात काहीजण दुचाकी व चारचाकी वाहनांतून अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या अमली पदार्थांच्या विळख्यात अनेक तरुण अडकत असून त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यासह कौटुंबिक जीवनावर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. व्यसनाधीनतेमुळे काही युवक गुन्हेगारीकडे वळत असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नुकत्याच नियुक्त झालेल्या अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार संगीता हेलोंडे आणि पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर यांच्या नेतृत्वाखाली या अवैध व्यवसायावर प्रभावी कारवाई होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.