पळसगाव जाट नदी पुलावर पुन्हा भीषण अपघात, बस व टिप्पर ची समोरासमोर धडक
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर: जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट नदी पुलावर गुरुवारी २ दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. राजुऱ्यावरून तुमसर कडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची जलद बस क्रं. एमएच १४ एमएच ३३५६ आणि नागपूरवरून सिंदेवाहीच्या दिशेने येणारा गिट्टीने भरलेला ट्रक क्रं. एमएच ४० टीसी ३२७३ यांची पुलावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बसमधील अंदाजे २५ ते ३० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.
धडक इतकी भीषण होती की बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा झाला. अपघातानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णवाहिका, पिकअप वाहने तसेच उपलब्ध इतर वाहनांच्या सहाय्याने सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठीही तातडीने उपाययोजना केल्या.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी याच पळसगाव जाट नदी पुलावर झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी भीषण अपघात झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेले तीव्र वळण आणि अपुऱ्या सुरक्षात्मक उपाययोजनांमुळे या ठिकाणी वारंवार जीवघेणे अपघात घडत आहेत. त्यामुळे पुलावर स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर, धोकादायक वळणाचे इशारा फलक, रम्बल स्ट्रिप्स आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, नागभीड ते सिंदेवाही शिवाजी चौकदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुढील दहा वर्षांसाठी HAM-१४४ पॅकेजअंतर्गत संबंधित कंत्राटदाराकडे आहे. मात्र, वारंवार अपघात होत असूनही आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करीत आहेत.