अल्लीपूर पोलिसांची मोठी कारवाई; एमडी ड्रग्ससह आरोपी जेरबंद, १.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
अल्लीपूर पोलिसांची मोठी कारवाई; एमडी ड्रग्ससह आरोपी जेरबंद, १.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी : सुनील हिंगे, अल्लीपूर
अल्लीपूर पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून १ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अल्लीपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी अल्लीपूर पोलिसांनी वर्धा-धोत्रा मार्गावरील नेरी नाल्यावरील पुलाजवळ गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली. यावेळी पंकज ऊर्फ आकाश बजरंग वाघमारे (रा. वर्धा) हा संशयितरित्या आढळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला.
तसेच आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईल फोन आणि टीव्हीएस ज्युपिटर मोपेड जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थ, मोबाईल व दुचाकीची एकूण किंमत १ लाख ३८ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशानुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत अल्लीपूरच्या ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंडे, पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदुळकर, पोलीस हवालदार अजय वानखेडे, अजय रिठे, रवी वर्मा, पंकज कापसे व सतीश हांडे यांनी सहभाग घेतला.
अमली पदार्थांविरोधातील ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांचा धाक कायम असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.