शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात १६ जून रोजी वर्ध्यात निषेध आंदोलन
शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात १६ जून रोजी वर्ध्यात निषेध आंदोलन
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत वर्ध्यात नाराजी व्यक्त करण्यात आली असून, या निर्णयाच्या निषेधार्थ १६ जून रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आली.
किसान अधिकार अभियानच्या वर्धा येथील कार्यालयात आयोजित बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी हितासाठी कार्यरत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत दि. २ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
उपस्थितांनी या निर्णयातील अटी व निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली. ही योजना अपुरी असून शेतकरी हिताला अपेक्षित न्याय देणारी नसल्याचे मतही बैठकीत मांडण्यात आले.
यावेळी सर्वानुमते ठराव मंजूर करून मंगळवार, दि. १६ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता वर्धा येथील महात्मा गांधी पुतळा परिसरात निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनादरम्यान शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात येणार असून शासनाकडे निवेदन सादर करून सुधारित व सर्वसमावेशक कर्जमाफी योजनेची मागणी करण्यात येणार आहे.
तसेच राज्यातील सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी व्यापक, पारदर्शक व सर्वसमावेशक कर्जमाफी योजना राबविण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
बैठकीस किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अॅड. अविनाश काकडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य उपाध्यक्ष यशवंतराव झाडे, अभियानाचे अध्यक्ष सुदाम पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, माजी जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, धैर्यशील जगताप, राजीव वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप भांडवलकर यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.