*कोटेश्वर येथे जागतिक नदी दिन साजरा – वर्धा नदी परिसर स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश*

Wed 24-Sep-2025,03:10 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण वर्धा 

वर्धा देवळी : “वर्धा नदी परिसर स्वच्छ करून दिलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश खरोखरच प्रशंसनीय आहे,” असे प्रतिपादन कोटेश्वर देवस्थान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी वीरेंद्र देशपांडे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना दिन व जागतिक नदी दिनानिमित्त २४ सप्टेंबर रोजी कोटेश्वर देवस्थान परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोटेश्वर देवस्थानाचे सचिव वीरेंद्र देशपांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे, एनसीसी अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीश यावले, रोव्हर लीडर संतोष तुरक आणि पत्रकार गणेश शेंडे उपस्थित होते.

या उपक्रमात स्थानिक एस. एस. एन. जे. महाविद्यालयातील ५५ एनसीसी छात्र सैनिक, ३० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच २० रोव्हर रेंजर्सनी सहभाग घेतला. जागतिक नदी दिनानिमित्त वर्धा नदीच्या घाटावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नदी किनाऱ्यावरचा कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला आणि “नदी परिसर स्वच्छ ठेवा” असा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले. संचालन अंडर ऑफिसर कोमल शितळे हिने केले, तर आभार प्रदर्शन कंपनी सार्जंट मेजर कल्याणी लिखार हिने मानले.

या स्वच्छता अभियानात सुजल पराते, समीक्षा निवारे, निशान चितळे, नयन तुमससरे, पायल चौके, कुंदन कावडे, विकी पेंदोलकर यांच्यासह अनेक छात्र सैनिकांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची सांगता नदी परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेऊन करण्यात आली.